नवी दिल्ली: 23 जुलै रोजी लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तारखेची घोषणा करताना, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारसीनुसार 22 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
संपूर्ण बजेट सादर होणार
निवडणुकीच्या निकालानंतर नव्या सरकारचा संपूर्ण अर्थसंकल्प सभागृहात सादर केला जाईल. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. जो 44.90 लाख कोटी रुपयांचा होता. ज्यामध्ये 11.11 लाख कोटी रुपये भांडवली खर्च म्हणून ठेवण्यात आले होते. तज्ञांच्या मते, या वेळी ते वाढू शकते. अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी घोषणा केली होती की, भांडवली खर्चासाठी राज्यांना देण्यात येणारी पन्नास वर्षांची व्याजमुक्त कर्ज योजना या वर्षीही सुरू राहील. ज्यासाठी एकूण 1.3 लाख कोटी रुपये असतील.
निर्मला सीतारामन करणार विक्रम
अर्थसंकल्प सादर करताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक मोठा विक्रम करणार आहेत. सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. सध्या त्यांनी माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकदा का त्यांनी संसदेत 2024 चा अर्थसंकल्प सादर केला, सीतारामन मोरारजी देसाईंचा विक्रम मागे टाकतील. तसेच सलग 7 अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री होतील. निर्मला सीतारामन या 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होत्या.