नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवहाराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाता किंवा एखाद्याला पैसे पाठवण्याचा प्रयत्न करता तेव्हा Transaction Fail होते आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. अशी परिस्थिती आता ओढावली तरी काळजी करू नका. बँकेलाच तुम्हाला परतावा द्यावा लागणार आहे.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर किंवा पैसे पाठवण्याचा प्रयत्न करताना Transaction Fail होते आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. ही परिस्थिती अनेकदा समोर येते, ज्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागते. हीच गरज लक्षात घेता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कडक नियम केले आहेत. पैशांच्या व्यवहारात काही व्यत्यय आल्यास आणि पैसे कापले गेल्यास, बँकेला मर्यादित कालावधीत परतावा द्यावा लागतो.
जर बँकेने संबंधित खातेदाराला परतावा केला नाही तर प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागणार आहे. RBI ने एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये TAT च्या बरोबरीने म्हणजेच ‘टर्न अराउंड टाईम’ आणि ग्राहकांना भरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही व्यवहारात बिघाड झाल्यास बँकेने डेबिट केलेले पैसे मुदतीच्या आत परत केले नाहीत तर बँकेला दंड भरावा लागेल. बँक जितक्या दिवस उशीर करेल तितक्या दिवसांसाठी दंडाची रक्कम दररोज वाढेल.
PoS, IMPS व्यवहार फेल झाल्यास…
जर तुमच्या खात्यातून PoS, कार्ड व्यवहार, IMPS, UPI मध्ये पैसे कापले गेले असतील. मात्र, दुसऱ्या खात्यात जमा झाले नसतील तर RBI ने यासाठी बँकेला T+1 दिवसाची वेळ दिली आहे. या कालावधीत पैसे हस्तांतरित न केल्यास, दुसऱ्या दिवसापासून बँकेवर 100 रुपये दंड आकारला जाणार आहे.