मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. या वर्षात आतापर्यंत भारतीय परकीय चलनाच्या साठ्यात 66 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, ती आता 689.235 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक आर्थिक संकटांपासून वाचवण्यात या परकीय चलनाची राखीव महत्त्वाची भूमिका बजावते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताची परकीय चलन मालमत्ता (FCA) आता $604.144 अब्जच्या पातळीवर उभी आहे. परकीय चलनाच्या साठ्याचा हा सर्वात मोठा भाग आहे. यासह, सोन्याच्या साठ्याचे मूल्य सध्या $61.988 अब्ज इतके आहे.
अर्थविश्वातील अंदाजानुसार, भारताचा परकीय चलनसाठा आता एक वर्षाचा अंदाजे आयात खर्च भरून काढण्यासाठी पुरेसा आहे. 2023 मध्ये, भारताने आपल्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 58 अब्ज डॉलरची वाढ केली आहे. याउलट, 2022 मध्ये भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 71 अब्ज डॉलरची घट झाली.
भारतीय रुपया; आशियातील स्थिर चलनांपैकी एक
एका दशकापूर्वी भारतीय रुपया हे आशियातील अस्थिर चलनांपैकी एक होते. पण आता, ते सर्वात स्थिर चलनांपैकी एक बनले आहे. हा बदल भारताच्या वाढत्या आर्थिक ताकदीचा आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रभावी व्यवस्थापनाचे यश असल्याचे म्हटले जात आहे.