नवी दिल्ली : सध्या सरकारी नोकरदारांसह खाजगी नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर उपयोगी पडते. मात्र, असे काही पर्याय आहेत त्यातून तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येऊ शकते.
तुम्हाला जर गरज पडली तर ते पैसे काढण्याची मुभा देखील सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, हे पैसे काढण्यासाठी सरकारने काही नियम देखील लावून दिले आहेत. कर्मचारी हे एकाच वेळी पूर्ण किंवा आंशिक पैसे काढू शकतात. त्यासाठी काही नियम देखील लावण्यात आलेले आहेत. जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी पीएफ काढत असाल तर तुमचा सेवेची 5 वर्षे पूर्ण होणे गरजेचे असते. जमीन खरेदी करण्यासाठी कर्मचारी हा पीएफमधून मूळ आणि महागाई भत्त्याच्या 24 पट रक्कम काढू शकतो.
यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर कर्मचारी एक महिना किंवा त्याहून अधिक बेरोजगार असेल, तर पीएफच्या 70 टक्के रक्कम त्या व्यक्तीला काढता येते. तर बेरोजगारीच्या पुढील दोन महिन्यात 25 टक्के रक्कम काढता येते. जर तसे नको असेल तर कर्मचाऱ्यांची रिटायरमेंट झाल्यानंतरही संपूर्ण पैसे काढता येतात.
तसेच जर वैद्यकीय उपचारासाठी पीएफ निधी काढायचा असेल, तर मूळ पगाराच्या 6 पट किंवा एकूण जमा रकमेच्या आणि पीएफमधील कर्मचाऱ्यांच्या व्याजाची रक्कम यापैकी जे कमी असेल ते तुम्ही काढू शकता. ही रक्कम स्वतः मुले आणि तुमचे जोडीदार आणि पालक यांच्यासाठी काढू शकता.