मुंबई : देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात 2023-24 मध्ये एकूण 159 अब्ज डिजिटल व्यवहार झाले. या कालावधीत, एकूण किरकोळ डिजिटल पेमेंटमध्ये UPI चे योगदान संख्येनुसार 91 टक्क्यांपर्यंत वाढेल, जे सध्या 80 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या PwC इंडियाच्या ‘द इंडियन पेमेंट हँडबुक 2024-29’ अहवालानुसार, देशात 2028-29 पर्यंत मूल्याच्या दृष्टीने 593 लाख कोटी रुपयांचे डिजिटल पेमेंट होईल, असा अंदाज आहे. हा आकडा 2023-24 च्या 265 लाख कोटी रुपयांपेक्षा 2.24 पट जास्त आहे. या कालावधीपर्यंत, UPI द्वारे व्यवहारांची संख्या सध्याच्या 131 अब्जवरून 3.35 पटीने वाढून 439 अब्ज होईल. UPI व्यवहारांचा वाढीचा दर सध्या 57 टक्के आहे.
UPI च्या वाढत्या वापरामुळे क्रेडिट कार्डचाही वापर वाढला आहे. 2023-24 मध्ये 1.6 कोटीहून अधिक नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले. यासह, देशात जारी केलेल्या क्रेडिट कार्डांच्या एकूण संख्येने 10 कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. 2028-29 पर्यंत जारी केलेल्या क्रेडिट कार्डांची संख्या 20 कोटी होईल, असाही अंदाज लावला जात आहे.