नवी दिल्ली : सध्या बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन माध्यमातून केले जात आहेत. पण तरीही काहीजण रोखीने व्यवहार करतात. त्यात एटीएमचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला माहितीये का एटीएमचा वापर फक्त पैशांच्या व्यवहारासाठी होत नाही, तर तुम्हाला या माध्यमातून विम्याचं संरक्षणही मिळतं.
कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड असले तरी त्याचा 45 दिवसांपासून अधिक काळासाठी खातेधारकाकडून वापर केला गेला असेल तर त्याला कार्डवर मोफत विमा संरक्षण मिळते. यात अपघात आणि जीवन विमा या दोन्हींचा समावेश असतो. खातेधारकाला ज्यावेळी बँकेकडून एटीएम कार्ड जारी केले जाते, त्याच दिवसांपासून अपघाती विमा आणि अवेळी मृत्यू आल्यास जीवन विमा लागू होतो. ही सेवा बँकांकडून मोफत दिली जाते. यासाठी बँकेकडे कोणतीही अधिकची कागदपत्रे जमा करावी लागत नाहीत.
बँकांची ही विमा पॉलिसी अॅक्टिव्हेट करण्यासाठी 30 दिवसांत कार्डचा किमान एकदा वापर झाला पाहिजे, अशी अट आहे. तर काही बँकांनी 10 दिवसांत कार्डच्या आधारे एक व्यवहार झाला पाहिजे, असे बंधन घातले आहे. त्यामुळे तुमच्याकडेही डेबिट कार्ड असेल आणि तुम्हाला याबाबतची अधिक माहिती हवी असेल तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता.