मुंबई: देशातील शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचा प्रवेश वाढत असल्याने डिमॅट खात्यांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. देशातील डिमॅट खात्यांची संख्या सप्टेंबरमधील १७.५ कोटींवरून ऑक्टोबरमध्ये १७.९. कोटींवर गेल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
ऑक्टोबरमध्ये ३५ लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून दर महिन्याला सरासरी ३९ लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदा नवीन डिमॅट खात्यांची संख्या ४० लाखांपेक्षा कमी झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील सक्रिय ग्राहकांची संख्या मासिक आधारावर २.४ टक्क्यांनी वाढून ४.८९ कोटी झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये एकूण डिमॅट खात्यांमध्ये तसेच नवीन डिमॅट खात्यांमध्ये सीडीएसएलचा बाजार हिस्सा वाढला आहे. या कालावधीत वार्षिक आधारावर एकूण डिमॅट खाती आणि नवीन डिमॅट खात्यांमधील एनएसडीएलचा बाजार हिस्सा अनुक्रमे ०.४० टक्के आणि ०.२१ टक्क्याने कमी झाला आहे.
एंजल वनच्या ग्राहकांची संख्या ७५ लाख, तर आयसीआयसीआय सिक्युरिटीज सारख्या पारंपरिक ब्रोकर्सच्या ग्राहकांची संख्या १९ लाख झाली आहे. कोटक सिक्युरिटीजच्या ग्राहकांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या ग्राहकांची संख्या १३ लाख झाली आहे.