बाजार नियामक सेबीने देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना मोठे अधिकार आणि सुरक्षा प्रदान करण्याची तयारी केली. गुंतवणूकदाराच्या डीमॅट खात्यामध्ये कोणतेही संशयास्पद व्यवहार झाल्यास गुंतवणूकदार त्याचे खाते क्रेडिट कार्डसारखे त्वरित ब्लॉक करू शकतील.
सध्या क्रेडिट कार्डमध्ये काही फसवणूक झाल्यास वापरकर्ता ताबडतोब ब्लॉक करू शकतो. त्याच धर्तीवर डिमॅट खात्यासाठीही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. सेबीने एक परिपत्रक जारी करून सर्व शेअर ब्रोकर्सना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ब्रोकर्सना 1 जुलै 2024 पासून त्यांच्या सर्व गुंतवणूकदारांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.
याशिवाय स्टॉक एक्स्चेंजलाही याबाबत योग्य मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले आहे. देशात 12.97 कोटी डीमॅट खाती आहेत. सेबीने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ही सुविधा 1 जुलै 2024 पासून स्वेच्छेने लागू केली जाईल. ज्या गुंतवणूकदारांना असे वाटते की त्यांना त्यांची खाती ब्लॉक करणे आवश्यक आहे, ते याचा लाभ घेऊ शकतील. या संदर्भात एक संपूर्ण फ्रेमवर्क तयार करण्यासाठी सेबी सर्व भागधारकांशी सल्लामसलत करत आहे.