मुंबई: भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार फ्लॅट ते निगेटिव्ह लेव्हलवर उघडला. बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स ७७.३२ अंकांनी किंवा ०.०९% ने घसरून ८०,५६३.७५ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ५० निर्देशांक १५.६५ अंकांनी किंवा ०.०६% ने घसरून २४,३६३.९५ वर व्यवहार करत होता.
या स्टॉकमध्ये मोठी घडामोड
निफ्टी ५० पॅकमधून टाटा मोटर्स, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स आज वरच्या स्थानावर आहेत. त्याचवेळी, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, एचयूएल आणि सन फार्मा यांचे शेअर्स सर्वात मोठ्या घसरणीसह उघडले.
बँकिंग निर्देशांक वाढला, आयटी, फार्मा आणि एफएमसीजीवर दबाव
क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे झाले तर, वित्तीय निर्देशांकात वाढ होत आहे. याशिवाय, ऑटोमध्येही वाढ झाली आहे. परंतु, निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी आणि निफ्टी एफएमसीजी हे अजूनही दबावाखाली आहेत.
हल्ल्यानंतर डिफेन्स स्टॉकमध्ये वाढ
ऑपरेशन सिंदूर नंतर, आजच्या व्यवहारात संरक्षण क्षेत्रातील समभागांवर खरेदीदार सक्रिय झाले आहेत. यामध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स ४ टक्क्यांनी वधारले, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स, कोचीन शिपयार्ड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, डेटा पॅटर्न (इंडिया) लिमिटेड आणि इतर कंपन्यांचे शेअर्सही सुमारे २ टक्क्यांनी वधारले.
८० हून अधिक दहशतवादी मारले गेले
हे उल्लेखनीय आहे की, भारतीय लष्कराने मंगळवार रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी हवाई हल्ले केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये ८० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. आज (दि. ७) होणाऱ्या मॉक ड्रिलच्या अगदी आधी सैन्याने ही कारवाई केली.