नवी दिल्ली: सीबीआयने डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवन यांना 34000 कोटी रुपयांच्या बँकिंग फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. धीरज वाधवन यांना सोमवारी 13 मे 2024 रोजी मुंबईत अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
34,000 कोटी रुपयांच्या 17 बँकांच्या कन्सोर्टियमच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांच्या संघाचे नेतृत्व करत आहे. 2022 मध्येच बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रात धीरज वाधवन यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. देशातील बँकिंग इतिहासातील ही सर्वात मोठी फसवणूक मानली जात आहे. याआधीही सीबीआयने येस बँक घोटाळ्याप्रकरणी धीरज वाधवान यांना अटक केली होती आणि सध्या ते या प्रकरणात जामिनावर आहेत.
सीबीआयने डीएचएफएलचे सीएमडी कपिल वाधवन आणि संचालक धीरज वाधवन यांच्यासह एकूण 74 लोक आणि 57 कंपन्यांविरुद्ध राऊस एव्हेन्यू कोर्ट, नवी दिल्लीच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर १७ बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीईओ हर्षिल मेहता यांच्या नावाचाही आरोपपत्रात समावेश होता.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या एपीआयआरमध्ये म्हटले आहे की, डीएचएफएलचे कपिल वाधवन, संचालक असलेले धीरज वाधवन आणि इतर आरोपींनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांसोबत फसवणूक करण्याचा कट रचला होता. गुन्हेगारी कट रचून या बँकांना 42,871.42 कोटी रुपयांचे कर्ज देण्यास सांगितले. मोठ्या प्रमाणात कर्ज काढून त्याचा गैरवापर करण्यात आला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डीएचएफएलच्या बुक्समध्ये हेराफेरी करण्यात आली होती. 31 जुलै 2020 पर्यंतच्या थकबाकीमुळे 17 बँकांच्या कन्सोर्टियमचे 34615 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.