नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून विस्तारा एअरलाईन्स एक चांगली आणि दर्जेदार विमानसेवा देत होती. मात्र, आता ही कंपनी एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. त्यानुसार, आजचे उड्डाण अखेरचे उड्डाण ठरले आहे. त्यामुळे कंपनीच्या शेवटच्या दिवशी अनेक क्रू मेंबर्स भावूक झाले होते.
विस्तारा एअरलाईन्स मंगळवारी (दि.12) एअर इंडिया समूहात विलीन होणार आहे. विलीनीकरणापूर्वी, विस्ताराच्या क्रू मेंबरने ‘कल हो ना हो…’ हे गाणे गायले. एअर इंडियाने जाहीर केले की, विस्ताराद्वारे चालवल्या जाणाऱ्या उड्डाणे दोन एअरलाईन्सच्या विलीनीकरणानंतर फ्लाइट कोड ‘AI2’ वापरतील. त्याचबरोबर विस्ताराने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही सोशल मीडियावर भावनिक नोट्स शेअर केल्या आहेत.
त्यात विस्ताराच्या शेवटच्या फ्लाईट्सचा एक भाग बनल्याबद्दल धन्य असल्याचे म्हटले आहे. या एअरलाईन्सने प्रवासाला ‘नवीन अनुभूती’ देण्याचा प्रयत्न केल्याचेही एका प्रवाशाने सोशल मीडियावर म्हटले आहे.
मंगळवारी होणार ‘एअर इंडिया’त विलीन
विस्तारा एअरलाईन्स आता उद्यापासून एअर इंडियामध्ये विलीन होणार असून, त्यानंतर एअर इंडिया विमान चालवणार आहे. आज ही एअरलाईन्स स्वतःच्या नावाने शेवटचे उड्डाण करणार आहे. या विलीनीकरणानंतर, पहिल्या महिन्यात विस्तारा एअर तिकीट असलेले 1,15,000 हून अधिक प्रवासी एअर इंडियाच्या फ्लाईट्समधून प्रवास करतील. प्रवाशांना विस्तारासारखाच अनुभव येईल, असे नव्या कंपनीने म्हटले आहे.