पुणे, ता. 10: उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे आज राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे.
दरम्यान आज दुपारी २ वाजता विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरूवात केला. सुरूवातच त्यांनी कवितेने केली. ‘‘लाडक्या बहिणी मिळाल्या म्हणून धन्य झालो…. आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो, ही काव्यपंक्ती अजितदादांनी सुरूवातीलाच वाचून दाखविली आणि हशा व टाळ्या यांचा विधानसभेत गजर झाला.
महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे ही त्यांनी बोलून दाखवले. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. शासनाने पायाभूत सुविधांवर गेलेल्या गुंतवणूकीमुळे मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आकर्षिक होत आहे.
येत्या वर्षात १५ लाख ७२ हजार कोटींची गुंतवणूक सामंजस्य करारातून होणार असून त्याद्वारे १६ लाख रोजगार मिळणार आहेत. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
येत्या ५ वर्षासाठी वीजेचा दर निश्चित केला जाणार, राज्यातील औद्योगिक वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील. यासह त्यांनी विविध गोष्टींची मांडणी केली.
उपमुख्यमंत्री पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.