लंडन: यूकेची बहुराष्ट्रीय बार्कलेज बँक (Barclays Bank Layoffs) मोठ्या कॉस्ट कटिंगची तयारी करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 1 अब्ज पौंड किंवा 1.25 अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्यासाठी किमान 2,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाऊ शकते. बार्कलेज बँक ही जगातील 10वी सर्वात मोठी बँक आहे आणि तिचे 81,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. बँकेची स्थापना 333 वर्षांपूर्वी 1690 मध्ये झाली.
भारतीय कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल का?
बार्कलेज बँकेत मोठ्या प्रमाणावर लेऑफच्या बातम्या येत असताना, भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बार्कलेज बँकेच्या या कॉस्ट कटिंगचा परिणाम प्रामुख्याने ब्रिटीश बँकेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. बँकेचे व्यवस्थापक आढावा घेण्याच्या कामात व्यस्त असून कंपनीने आपली योजना पुढे रेटल्यास किमान 1500 ते 2000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
दरम्यान या प्रकरणाची माहिती देताना बार्कलेजचे सीईओ सीएस वेंकटकृष्णन यांनी सांगितले की, बँक येत्या काही दिवसांत एकूण अब्जावधी पौंडांच्या खर्चात कपात करण्याचा विचार करत आहे. या कपातीचा सर्वाधिक परिणाम बार्कलेज एक्झिक्युशन सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होईल, ज्यांना BX म्हणून ओळखले जाते.
बार्कलेज दीर्घकालीन किरकोळ आणि गुंतवणूकीच्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी लेऑफचा पर्यायही अवलंबला जात आहे. यासोबतच बँकेने कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही कपात केली आहे. या कॉस्ट कटिंगद्वारे बँकेला आपला खर्च ते उत्पन्न गुणोत्तर सुधारायचे आहे आणि हे सीईओ सीएस वेंकटकृष्णन यांच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे.