नवी दिल्ली : बँकांची बँक अशी ओळख असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक कर्जदारांपैकी एक असलेल्या बजाज फायनान्सला (Bajaj Finance) मोठा झटका दिला आहे. आरबीआयने बजाज फायनान्सच्या दोन उत्पादनांतर्गत तात्काळ कर्ज देण्यास रोखले आहे. या दोन उत्पादनांनी डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात आले आहे.
बजाज फायनान्सने eCOM आणि Insta EMI कार्ड कर्ज देणाऱ्या उत्पादनांतर्गत कर्जदारांना महत्त्वाची माहिती दिली नाही, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे. इतर डिजिटल कर्जांच्या माहितीमध्ये कमतरता होत्या. असे असले तरी बजाज फायनान्सने यामध्ये जर सुधारणा केली तर लादलेल्या निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असेही आरबीआयने म्हटले आहे.
बजाज फायनान्सच्या वेबसाईटनुसार, Insta EMI कार्ड ग्राहकांना खरेदीसाठी दोन लाख रुपयांपर्यंत प्री-अप्रूव्हड क्रेडिट ऑफर दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात वेबसाईटवर eCOM उत्पादनासंदर्भात कोणतीही माहिती दिली गेली नाही. दरम्यान, डिजिटल कर्जाशी संबंधित शुल्काबाबत अपुऱ्या माहितीसह, अयोग्य डिजिटल कर्ज पद्धतींच्या तक्रारींनंतर मार्गदर्शक तत्त्वे सादर करण्यात आली. त्याची पूर्तता न केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.