नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा या दोन कंपन्यांकडून चांगला नफा मिळत आहे. असे जरी असले तरीही या दोन कंपन्यांचे तिमाही निकाल सकारात्मक आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी SECI ने रिलायन्स पॉवरला नोटीस पाठवली आहे.
SECI ने बनावट बँक हमी प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये SECI ने अंबानी यांच्याविरोधात फौजदारी कारवाई का सुरू करू नये, अशी विचारणा केली आहे. यानंतर त्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आता SEBI ने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) निधीच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणात 26 कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम भरण्यासाठी बिग एंटरटेनमेंट कंपनीला नोटीस पाठवली आहे.
कंपनीने चुकीच्या पद्धतीने पैसे काढले असून अद्याप दंड भरला नसल्याने कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, रिलायन्स बिग एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने नोटीस जारी केल्यापासून 15 दिवसांच्या आत पेमेंट न केल्यास त्यांची बँक खाती आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा इशारा SEBI कडून देण्यात आला होता.