नवी दिल्ली : देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, जवळपास सर्वच वस्तूंवर जीएसटी लावला जात आहे. त्यात आता मोठी माहिती समोर आली आहे. 44,015 कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघडकीस आल्याचे जीएसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
मे 2023 पासून सुरू केलेल्या करचुकवेगिरी विरोधातील तपास मोहिमेत ही माहिती जीएसटी अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय देशभरात एकूण 29,273 बनावट कंपन्याही आढळून आल्या आहेत. करचुकवेगिरीच्या प्रकरणात 121 जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी यापैकी 2,358 बनावट कंपन्यांचा शोध घेतला. त्यापैकी सर्वाधिक 926 कंपन्या महाराष्ट्रात, त्यानंतर राजस्थानमध्ये 507, दिल्लीत 483 आणि हरियाणामध्ये अशा 424 कंपन्या आढळून आल्यात.
महाराष्ट्रातील 926 शेल कंपन्यांनी 2,201 कोटी रुपयांचा कर चुकवला आहे. या कारवाईदरम्यान 11 जणांना अटक करण्यात आली. दिल्लीतील 483 बनावट कंपन्यांनी 3,028 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा संशय आहे. तिथंही 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 4,153 बनावट कंपन्या
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 4,153 बनावट कंपन्या आढळून आल्या. या कंपन्यांनी सुमारे 12,036 कोटी रुपयांची करचोरी केली आहे. या प्रकरणांमध्ये 41 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 31 जणांना केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.