Anmol Ambani Update : उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल अंबानी यांना शेअर बजार नियमाक सेबीने तब्बल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिलायन्स होम फायनान्सने तपासाशिवाय कॉर्पोरेट लोन मंजूर केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे. रिलायन्स हाऊसिंग फायनान्सच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर असलेले कृष्णन गोपालकृष्णन यांनाही सेबीने 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुढच्या 45 दिवसांत हा दंड भरावा लागणार असल्याचे सेबीने आदेशात म्हटलं आहे.
सोमवारी (दि.23) रोजी SEBI ने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, आमचा रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या बाबतीत सुरु असलेला तपास पूर्ण झाला आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असलेल्या अनमोल अंबानी यांनी कर्ज देण्याची परवानगी नसताना कॉर्पोरेट कर्ज दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचे हे कृत्य सेबीच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळेच त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, सेबीने ऑगस्ट महिन्यात अनिल अंबानी यांच्यासह इतर 24 जणांना भांडवली बाजारात व्यवहार करण्यास 5 वर्षांसाठी बंदी घातली होती. रिलायन्स होम फायनान्सचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. तसेच, त्यांना 25 कोटी रुपयांचा दंडही त्यावेळी ठोठाविण्यात आला होता.
सेबीच्या आदेशात नेमकं काय?
सोमवारी सेबीने अनमोल अंबांनी यांच्याबाबत एक आदेश जारी केला. या आदेशात रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळात सामील असलेल्या अनमोल अंबानी यांनी सर्वसाधारण उद्देशासाठी कॉरपोरेट, जीपीसीएल कर्ज मंजूर केले होते. संचालक मंडळाने असे कर्ज मंजूर करू नये असे सांगितलेले असूनदेखील त्यांनी या कर्जाला मंजुरी दिली, असे सेबीने म्हटले आहे. अनमोल अंबानी यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी एक्यूरा प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 20 कोटी रुपयांचे कर्ज मंजुर केले होते.