मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. काळ अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज विधानसभेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र आजच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वीच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी खिशात नाही आणा, बाजीराव म्हणा.., लुटारू सरकार हाय हाय, ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत आंदोलन केले.
विरोधकांचा हल्लाबोल..
महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट, बजेटमधून विधानसभेच्या तयारीचा येतोय वास या घोषणांनी आज विधानभवनाचा परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली. विधानसभेला मस्का अशी महायुतीची अवस्था आहे. अर्थसंकल्पावरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस पडला पण हा तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा आटापिटा आहे. यावरून महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. भाऊ म्हणून दाखवलं महिलांना योजनांचे भुल, महिलाच करतील निवडणुकीत गूल, निधीची वानवा आणि खैरातीचा गारवा अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी दिल्या..
‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, लुटारू सरकार हाय हाय, 40 टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, या घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाची पोलखोल केल्याचे चित्र दिसून आले. या घोषणांचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान, यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसून आले.