मुंबई : ज्या खातेदारांचे बँकांत देय थकीत आहे अर्थात जे लोक बँकाचे थकबाकीदार आहेत त्यांना आता दणका बसणार आहे. कारण, भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘विलफुल डिफॉल्टर्स’ आणि मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जारी केले. आरबीआयने दिलेल्या बँकांच्या आदेशानंतर थकबाकीदारांच्या अडचणी वाढणार आहेत.
‘विलफुल डिफॉल्टर’ म्हणजे कर्जदार किंवा जामीनदार ज्याने जाणूनबुजून कर्जाची परतफेड केली नाही आणि थकबाकीची रक्कम रुपये 25 लाखांपेक्षा जास्त आहे. बँका एखाद्या व्यक्तीची ओळख पटवतील आणि विशिष्ट प्रक्रियेचा अवलंब करून त्याला ‘विलफुल डिफॉल्टर’ म्हणून वर्गीकृत करतील. यामध्ये बँका 25 लाख आणि त्याहून अधिक थकबाकी असलेल्या सर्व एनपीए खात्यांमध्ये ‘विलफुल डिफॉल्ट’साठी नियतकालिक तपासणी करतील, असे आरबीआयने सांगितले.
बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसीज) 25 लाख आणि त्याहून अधिक थकबाकी असलेल्या सर्व नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) खात्यांमधील ‘विलफुल डिफॉल्ट’ची चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांच्या अडचणी वाढणार आहेत.