नवी दिल्ली : अनेक गुंतवणूकदार आपली रक्कम विविध माध्यमांमध्ये गुंतवतात. त्यात शेअर मार्केट, बँकेत आणि सोनं खरेदी हे प्रमुख पर्याय मानले जातात. असे असताना आता सोने खरेदी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतात सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक असून, गेल्या महिनाभरातच तब्बल 722 कोटी रुपयांचे सोनं भारतीयांनी खरेदी केलं आहे.
सोन्याच्या दरात अनेकदा चढउतार पाहिला मिळत आहेत. पण, सध्या 10 ग्रॅम सोने अर्थात एक तोळा सोनं 70 ते 72 हजारांच्या जवळपास आहे. तरी देखील सोनं खरेदी करणाऱ्यांचा कल कमी झालेला दिसत नाही. गेल्या काही वर्षांत भारताच्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोनं खरेदीत विक्रम केला आहे. गेल्या मे महिन्यात भारतानं 722 कोटी रुपयांचे सोनं खरेदी केलं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यात भारत आता जगात तिसरा क्रमांकाचा देश ठरला आहे.
सध्या सोने खरेदीत स्वित्झर्लंडचा जगात पहिला क्रमांक लागतो. या देशानं महिनाभरात 312.4 टन सोने खरेदी केले आहे. या खरेदीचे मूल्य 2,461 कोटी रुपये आहे. तर त्यानंतर दुसरा क्रमांक हा चीन या देशाचा लागतो. चीनने 2,109 कोटी रुपयांचे तब्बल 86.8 टन सोने खरेदी केले आहे. त्यानंतर आपल्या भारत देशाचा क्रमांक लागतो. भारत सोने खरेदीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.