नवी दिल्ली: मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून दीड ते अडीच लाखांचा निधी दिला जात होता. आता निधीत कोणतीही वाढ न करता या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी अंतरिम अर्थ संकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीणमधून दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. गरीब, महिला आणि शेतकरी यांना प्राधान्य असणार आहेत. आतापर्यंत ७० टक्के महिलांना या योजनेचा लाभ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेतून तीन कोटी घरे बांधण्यात येणार होती. त्या संख्येच्या सरकार अगदी जवळ आले आहे. आता पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जाणार आहेत. तसेच आमचे सरकार मध्यमवर्गातील पात्र घटकांना त्यांची स्वतःची घरे खरेदी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू करेल, असे देखील सीतारामन यांनी म्हटले आहे.
आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसाठीही मोठी घोषणा
दरम्यान आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. देशभरातील सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या. यामध्ये महिला, तरुण आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत.