नवी दिल्ली : ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अर्थात LIC ची ओळख संपूर्ण देशभर आहे. ही विमा कंपनी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यात आता या विमा कंपनीने खास महिलांसाठी एक योजना आणली आहे. विमा सखी योजना असे याचे नाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नवीन विमा सखी योजना लाँच केली आहे. ही योजना खास महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणण्यात आली असून, यामध्ये त्यांना एलआयसी एजंट बनण्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच त्यांना दरमहा 5,000 ते 7,000 रुपये दिले जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण होताच कमाई सुरू होणार आहे. LIC विमा सखी योजना ही केवळ ग्रामीण महिलांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणार नाही, तर भारतातील वंचित भागात विम्याची पोहोच वाढवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.
या सरकारी योजनेंतर्गत देशभरातून त्यात सहभागी होणाऱ्या महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एवढेच नाही तर प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी 7 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5 हजार रुपये मासिक भत्ता देण्याची तरतूद आहे. ज्या महिला त्यांचे टार्गेट पूर्ण करतात त्यांना कमिशन आधारित प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे.