पुणे : पुण्यातील कोथरुड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शंकर कदम (वय २३), प्रवीण शंकर कदम (वय २९, दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, यश कालीदास जगताप (वय १८, रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी सचिन आणि प्रवीण हे यशच्या ओळखीचे आहेत. रविवारी (ता. ४ ) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास यश मित्रांबरोबर साईनाथ वसाहतीत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपींनी यशला शिवीगाळ केली. त्यानंतर यश आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला.
दरम्यान, आरोपींनी यशवर कोयत्याने वार केला. यानंतर यश गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.