पुणे – घोटावडे येथे चार दिवसापुर्वी आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उलघडण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. प्रशांत आनंदा डोळस (रा. डोकवस्ती अशोकनगर भोसरी पुणे) हे मयताचे नाव आहे. प्रशांत मित्राच्या मेहुणीशी वारंवार गप्पा मारत असल्याने, त्यांचे व संबधित महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून, त्याच्याच मित्रांनी प्रशांतचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
प्रशांत डोळस याचा खुन केल्या प्रककरणी, पौड पोलिसांनी शेखर तात्याराम पाटोळे (वय-३३, विठठलनगर लांडेवाडी भोसरी पुणे), लखन भास्कर वाघमारे वय-२९, रा. गोकुलनगर पठार, वारजे पुणे )दत्ता उर्फ बाबा चत्रभुज शिनगारे (वय-२७ रा. आंबेडकरनगर लांडेवाडी भोसरी पुणे) अशी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी मयताचा भाऊ प्रविण आनंदा डोळस (रा. अशोकनगर भोसरी पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडे ते हिंजवडी रस्त्याच्या कडेला बापुजीबुवा मंदीराजवळ चार दिवसापुर्वी एका पुरुषाचा मृतदेह सुमारास आढळून आला होता. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना २० ऑगस्टला भोसरी पोलीस ठाण्यात दाखल मिसींगमधील वर्णनाचा व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मिसिंगच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. आणि नातेवाईकांनी सदर मृतदेह हा प्रशांत डोळस यांचा असल्याचे सांगितले. पोलिसांना अनोळखी मयताची ओळख पटविण्यात यश आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.
सायबर सेलचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे व त्यांच्या टिमने केलेल्या तपासात प्रशांतच्या मोबाईलवर २१ ऑगस्टला एकाच इसमाचे ४ कॉल आल्याचे दिसून आले. पोलिसांनी शेवटचे कॉल असणारे नंबरचे नाव पत्ता माहिती घेतली असता सदर व्यक्ती शेखर पाटोळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. यावर पोलिसांनी शेखर पाटोळे यांना त्याब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, मेव्हणीशी असलेले अनैतिक संबंध व कामावरून टाकल्याच्या संशयावरून प्रशांतचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच हा खून लखन वाघमारे आणि दत्ता उर्फ बाबा शिनगारे यांच्या मदतीने केला असल्याचेही पोलिसांना सांगितले आहे.
हि कामगिरी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड ,पोलीस उपनिरीक्षक विनायक देवकर, श्रीकांत जाधव , सहाय्यक फौजदार उपनिरीक्षक नाना रोड , पोलीस हवालदार नितीन रावते, संदिप सपकाळ, रॉकी देवकाते, विराज कामटे, प्रशांत युग, सिध्देश पाटील, आया सोनवणे, सागर नामदास, साहिल शेख, आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांच्या पथकाने केली आहे. तर गुन्हयाचे तांत्रीक तपासात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे , पोलीस नाईक सुनिल कोळी आणि वेतन पाटील यांचे विशेष योगदान मिळाले. तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख प्रमोद बलकवडे व त्यांच्या सहकार्यांचे विशेष सहकार्य मिळाले.