पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणावर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे.
ऋषिकेश मोहिते (वय २१, रा. नवी खडकी, येरवडा) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मोहसीन अन्वर खान (वय ३२, रा. जिजामाता नगर, नवी खडकी, येरवडा) असे वार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ऋषिकेश मोहिते यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका सराईत गुन्हेगार मोहसीन खान याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहसीन खान हा सराईत गुन्हेगार आहे. मोहिते हा पोलिसांचा खबरी असल्याचा संशय खानला होता. त्याने नवी खडकी परिसरातून निघालेल्या मोहितेला अडवून त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले तसेच दहशत माजविली. खान याने केलेल्या हल्ल्यात मोहिते जखमी झाला आहे. पसार झालेल्या खानला पोलिसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव तपास करत आहेत.