राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावठी हातभट्टींवरील छापा टाकण्याचे सत्र सुरू असून, नुकतेच यवत येथील दोन, पिंपळगाव येथील एका हातभट्टी चालकांवर कारवाई केल्यानंतर शनिवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास खोर गावच्या हद्दीतील श्रीकर इंटरप्राईजेस कंपनीजवळ गावठी हातभट्टी बनवत असलेल्या ठिकाणी यवत पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
यामध्ये शबीर युवराज गुडदावत याच्याकडून ३ हजार ५०० लिटर कच्चे रसायन व ३५ लिटर तयार गावठी हातभट्टी असा एकूण ८७ हजार २५० रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत पोलीस हवालदार महेंद्र चांदणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शबीर युवराज गुडदावत (वय ४० रा. खोर, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भोसले हे करत आहेत.