Yavat News यवत : वरवंड (ता. दौंड) येथे वहिनीला तिचे वडील मरणानंतर संपत्ती देणार नाहीत. असा राग मनात धरून वहिनींच्या वडिलांचा खून करून घरामध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. मात्र तब्बल १ वर्षानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ४ जणांना गुन्हा दाखल केला आहे. (Yavat News)
सुरेश नेमीचंद गांधी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर अतुल जगताप, प्रणव भंडारी, विजय मंडले, राकेश भंडारी (सर्व रा.वरंवड ता.दौड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सदर घटना ही २७ मार्च २०२२ रोजी घडली आहे. याप्रकरणी कालीदास शिवदास शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश भंडारी याने आपली वहिनी सपना राहुल भंडारी यांना त्यांचे वडील सुरेश नेमीचंद गांधी हे त्यांचे मरणानंतर मालमत्तेमध्ये हक्क देणार नाहीत. याचा राग मनात धरून आरोपी राकेश भंडारी व त्याच्या मित्रांनी सुरेश गांधी यांचा वरंवड हद्दीतील वन विभागाच्या जमीनीमध्ये गळा दाबुन खुन केला.
त्यानंतर आरोपींनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी ते घरामध्ये पाय घसरून पडुन मयत झाले असा खोटा बनाव रचला. आणि अशी खोटी माहिती सर्व नातेवाईकांना सांगितली. व मृतदेहाचे शवविच्छेदन न करता अंत्यविधी केला.
दरम्यान, वरवंड येथील कालीदास शिवदास शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्याततब्बल १ वर्षानंतर फिर्याद दिली. या घटनेनंतर पोलीसही चक्रावून गेले.
या घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चार जणांवर खुन करणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहे.