संदीप टूले
केडगाव, (पुणे) : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्री भुलेश्वर महादेव मंदिर यवत व माळशिरस येथील गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मंदिर बंद केले होते. मंगळवारी (दि.१९) ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी हा प्रकार घडला असून, संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचे आगमन होत असताना दुसरीकडे ग्रामस्थांनी मंदिर बंद केले होते. पोलिस प्रशासनाने वेळीच मध्यस्थी केल्यामुळे काही काळानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
गेल्या काही दिवसापूर्वी श्रावण महिन्यात यवत येथील काही तरुण व माळशिरसचे ग्रामस्थ यांच्यात कर आकरणीवरून व गाडी सोडण्यावरून किरकोळ वाद झाला होता. तो वाद दोन दिवसात मिटलाही होता. परंतु असाच प्रकार रविवारी परत घडल्याने हा वाद विकोपाला गेला.
यवत ग्रामस्थांची मागणी होती की, येथील जो कर आकारला जातो तो बेकायदेशररित्या असून हे मंदिर पुरातन विभागाच्या अधिपत्याखाली आहे. माळशिरस ग्रामपंचायत व येथील पुजारी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक करत असून, ५० रुपये प्रति वाहन कर आकारला जातो. तो कुठे तरी थांबला पाहिजे, अशी यवत ग्रामस्थांची मागणी आहे.
माळशिरस ग्रामस्थांची असे म्हणणे आहे की, येथे जो कर गोळा करण्यासाठी ग्रामसभेने एक ठराव घेऊन रीतसर लिलाव पद्धतीने केला आहे. त्यामुळे हा कर सर्रास पद्धतीने गोळा केला जात असून, यात कसलाही दुजाभाव केला जात नसून आमचा कर गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे योग्य नाही.
दरम्यान, या वादाचा परिसरातील व बाहेरून आलेल्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला असून, या प्रकाराची सर्वच स्तरातून टीका होत आहे.