राहुलकुमार अवचट
Yavat News : महिला पत्रकार स्नेहा बारवे यांना आमच्या गावच्या खड्ड्यांवर आणि तमाशावर बातमी का बनवली? असे म्हणत रस्त्यात अडवून घातपात करण्याची आणि कार्यालयात घुसून तोडफोड करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणानंतर महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद आक्रमक झाला असून, दौंड तालुका सोशल मीडिया परिषदच्या वतीने यवत पोलीस स्टेशनला निवेदन देत सदर घटनेचा निषेध करण्यात आला.(Yavat News)
नारोडी (ता. आंबेगाव) गावातून नारोडी फाट्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून झालेल्या दुर्दश्येवर एका स्थानिक वृत्तवाहिनीवर सोमवारी (दि.२४) एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्तामध्ये गावातील पुढाऱ्यांना तमाशा भरविण्यासाठी आर्थिक तरतूद करता येते. मात्र, रस्त्यांच्या दुर्दशेवर आणि इतर समस्यांवर लक्ष देण्यासाठी आर्थिक चणचण भासते, अशा आशयाचे भाष्य करण्यात आले होते. हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गावातील काही पुढाऱ्यांनी महिला पत्रकार स्नेहा बारवे यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून धमकाविले. ‘आम्ही आमच्या गावात काहीही करू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? आम्ही तमाशा भरवू किंवा पैसे उधळू, तुम्हाला काय करायचं आहे? आम्ही तुम्हाला सोडणार नाही’.(Yavat News)
तसेच ‘आम्ही आमच्या गावातील महिलांना तुमची गाडी अडवून पाहून घेतील. तुम्हाला रस्त्याने जाऊ देणार नाही. तुमच्या कार्यालयात काही ठेवणार नाही’, अशा पद्धतीने धमकी दिली. स्नेहा बारवे यांना नारोडी गावातील गावगुंडांनी आणि तमाशा शौकिनांनी दिलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदच्या वतीने यवत पोलीस स्टेशन येथे अनेक पदाधिकारी जमले होते.(Yavat News)
दरम्यान, यवत पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार मेघराज जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा प्रतिनिधी एम. जी. शेलार, दौंड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष रविंद्र खोरकर, महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद दौंड तालुका अध्यक्ष दीपक पवार, उपाध्यक्ष विनायक दोरगे, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, सचिव राहुल अवचट, बाळासाहेब मुळीक, अनिल गायकवाड, संदीप भालेराव, संदीप सोनावणे, सुशांत जगताप, मनोज कांबळे यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.(Yavat News)
निषेध व्यक्त करण्यात येणार
पश्चिम महाराष्ट्रसह राज्यभरात नावाजलेल्या पत्रकार बारवे यांना जर गावगुंड अशा पद्धतीची धमकी देण्याची हिंमत करत असतील तर सर्वसामान्य पत्रकारांची काय अवस्था असेल, असे म्हणत महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेच्या वतीने यवत पोलीस स्टेशन येथे निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले असून, महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद दौंड तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले आहे.(Yavat News)