Yavat Crime यवत, (पुणे) : नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका १७ वर्षीय मुलाने घराशेजारी असलेल्या गोठ्यात अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पिलानवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत उघडकीस आली.
प्रेमकुमार शिवाजी मोरे (वय-१७, रा. पिलानवाडी, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत मृत मुलाचे चुलते आप्पा हनुमंत मोरे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आप्पा मोरे हे काही कामानिमित्त पिंपळगाव येथे गेले होते. यावेळी त्यांचा पुतण्या राहुल मोरे याने फोन करून सांगितले की, प्रेमकुमार याने घराशेजारी असणाऱ्या गोठ्यामधील लोंखडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही माहिती मिळताच भाऊ शिवाजी हनुमंत मोरे यांचे घरी गेलो असता तेथे जमलेल्या लोकांनी पुतण्या प्रेमकुमार शिवाजी मोरे याचा गळफास काढुन खाली उतरून ठेवले. त्याला यवत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगितले.
दरम्यान, याबाबत आप्पा हनुमंत मोरे यांच्या फिर्यादीनुसार यवत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार कदम तपास करीत आहेत.