पिंपरी(पुणे) : वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत अल्पवयीन मुलासोबत दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली. भोसरी, पिंपरी, शिरुर आणि इतर भागातून दुचाकी चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून चोरीच्या दोन लाख ३० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मोहंमद राशीद शाहीद शेख (२०, रा. वल्लभनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू होती. त्यात मोहंमद राशीद हा संशयितपणे वावरताना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
दरम्यान, मोहंमद राशीद हा एका १६ वर्षीय मुलासोबत मिळून दुचाकी चोरी करायचा. चोरलेल्या दुचाकी एमआयडीसीतील कंपन्यांच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क करायचा. काही दिवसांनंतर ती चोरीची दुचाकी पुन्हा इतर ठिकाणी पार्क करायचा. त्याने चोरी केलेल्या सात दुचाकी त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत. तसेच दुचाकी चोरीप्रकरणी सहा गुन्ह्यांचा उलगडा देखील झाला आहे.
सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, पोलिस अंमलदार हेमंत खरात, डी. बी. केंद्रे, रमेश भोसले, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.