पुणे : पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बुधवार पेठेत एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या पहिल्या पतीने, तिच्या दुसऱ्या पतीचा वस्तऱ्याने गळा चिरून निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नईम शेख असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून कलाम उर्फ रूबेल शेख याला ताब्यात घेतले आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास क्रांती चौकाच्या बाजूला नवीन सागर इमारतीजवळ घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कलाम याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, संबंधित महिला बुधवार पेठेत वास्तव्यास आहे. कलाम शेख हा तिचा पहिला पती आहे. तर नईम शेख हा तिचा दुसरा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी नईम याने महिलेसोबत लग्न केले आहे. तेव्हापासून ते एकत्र राहात होते. हा प्रकार कलाम याला समजला होता. त्याच्या मनात नईमबाबत राग होता. त्याच रागातून त्याने शुक्रवारी सायंकाळी वस्तऱ्याने नईमचा गळा चिरून निर्घुण खेन केला.
नईम लहान मुलाला घेऊन इमारतीच्या खाली फिरत होता. त्या वेळी कलाम हा तिथे आला. काही वेळातच त्याने खिशातून वस्तरा काढून नईमच्या गळ्यावर फिरवला. जखमी नईमला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेनंतर कलाम हा फरार झाला होता. तो रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी नईमला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं.