इंदौर : अज्ञात महिलेच्या हत्येनंतर शरिराचे तुकडे करून ठेवलेल्या दोन पिशव्या मध्य प्रदेशातील इंदौर स्थानकावरील एका रेल्वेत आढळून आल्याने खळबळ उडाली. तेथील स्वच्छता कर्मचाऱ्याने या घटनेची माहिती दिल्यानंतर रेल्वे डब्यातून या पिशव्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. पीडित महिला २० ते २५ या वयोगटातील असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या महिलेच्या डोक्यापासून कंबरेपर्यंतचा भाग एका ट्रॉली बॅगमध्ये, तर कंबरेखालचा काही भाग एका प्लस्टिकच्या पिशवीत आढळून आला. महिलेचे दोन्ही पाय व दोन्ही हात गायब असल्याने या हत्येचे गूढ वाढले आहे.
दोन दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाल्याचा अंदाज आहे. शनिवारी रात्री इंदौर स्थानकावर सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर डॉ. आंबेडकरनगर-इंदौर रेल्वे देखभालीसाठी ट्रेन यार्डात दाखल झाली. यानंतर एका स्वच्छता कर्मचाऱ्याला या पिशव्या आढळून आल्या. संबंधित प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, महिलेची ओळख पटवण्यात येत असल्याची माहिती शासकीय रेल्वे पोलिसांचे स्टेशन प्रभारी संजय शुक्ल यांनी दिली.