पुणे : Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरिफ खान, रवी आणि रियाज अशा ३ जणांविरोधात बलात्कार, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ यादरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरिफ खाननने पीडितेला आपण तिच्या पतीचा मित्र असल्याचे सांगितले. तसेच Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो. असे सांगितले.
त्यानंतर आरोपी आरिफने पीडित महिलेला एक डिलिव्हरी करायची आहे सांगत भेटण्यास बोलावले. त्यानंतर पीडितेला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आणि याबाबत कोणाला काही सांगितले तर दुसरा आरोपी रवीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे १ लाखांची खंडणी मागितली. तर, तिसऱ्या आरोपीने पीडितेला सातत्याने धमकी दिली.
दरम्यान, आरोपींच्या जाचाला कंटाळून पीडितेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात वरील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.