पुणे : महिलेच्या छेडछाडीमधून झालेल्या वादात एकाने धारदार शस्त्राने दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना औद्योगिक वसाहती मधील सावरदरी (ता. खेड) येथील भक्ती अपार्टमेंट समोर घडली आहे. यामुळे लोकांमध्ये वाद निर्माण होऊन त्यातून डबल मर्डर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सूरज नंदकुमार चव्हाण (वय-२७, सध्या रा. सावरदरी) आणि अनिकेत किसन पवार (वय-२४ सध्या रा. तरस यांची भाड्याची खोली, सावरदरी, ता. खेड) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. प्रदीप दिलीप भगत (सध्या रा. शिवमपार्क, सावरदरी) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी खून करून फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी गावामध्ये वरील सर्व जण भाडेकरू म्हणून राहतात. सूरज चव्हाण हा आपल्या कुटुंबासह राहत आहे. यापूर्वी प्रदीप हा फिर्यादीच्या शेजारील महिलेची वारंवार छेड काढत होता. प्रदीप याने शनिवारी (ता. ०८) सदर महिलेच्या बाथरूमची खिडकी फोडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सूरज चव्हाण त्याचा मित्र अनिकेत आणि प्रदीप यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन प्रदीप याने दोघांवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला.
सूरज आणि अनिकेत यांना वर्मी घाव लागल्याने एक जण जागेवरच कोसळला. तर एक गंभीर जखमीस स्थानिक नागरिकांनी अधिक उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले. परंतु डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच निधन झाल्याचे सांगितले. औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी येथील भाडेकरू म्हणून राहत असलेल्या लोकांमध्ये वाद निर्माण होऊन त्यातून डबल मर्डर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खून करून फरारी झालेल्या आरोपीच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.