पिंपरी : जुन्या भांडणाच्या वादातून महिलेने एकाच कुटूंबातील पाच व्यक्तींना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी 8 जानेवारीला विश्वेश्वर चौक एमआयडीसी भोसरी या ठिकाणी घडली. याप्रकरणी प्रेम सुधीर जावळे (वय 20, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी महिला आणि फिर्यादी यांच्या कुटूंबाचे जुने वाद आहेत. या वादातून आरोपी महिलेने फिर्यादी यांचा चुलत भाऊ, चुलता, आजी, आजोबा आणि बहिणीला लाथाबुक्क्यांनी तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली आहे. याप्रकरणी सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.