हडपसर : मांजरी महादेवनगर रस्त्यावर दूध वाहतूक करणाऱ्या टँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. हि घटना रविवारी (ता. १३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अन्नपूर्णा उर्फ सुमन विजय पाटील (वय ४२, रा. महादेवनगर, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकरचालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजय पाटील व त्यांची पत्नी सुमन हे दोघे दुचाकीवरून मांजरी – महादेवनगर रस्त्याने जात होते. त्या वेळी भरधाव वेगाने पाठीमागून टँकर आला.
अरुंद रस्त्यावर असलेल्या वळणावर दुचाकीस्वार विजय यांचे नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीस्वार विजय यांचा तोल जाऊन खाली पडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या टँकरच्या धडकेने दुचाकीवरील अन्नपूर्णा या गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातानंतर मांजरी-महादेवनगर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरचालकाला ताब्यात घेतले.
त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.