पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात एका महिलेची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रेरणा शिवाजी ढाकणे (२९, रा. शिंदे डेअरी जवळ, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून झेउर रेहमान आणि इतर व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ मार्च २०२० ते ५ ऑक्टोबर २०२२ या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी झेउर रेहमान हे फिक्शन फिटनेस जिमचे मालक आहेत. फिर्यादी प्रेरणा ढाकणे आणि झेउर रेहमान यांची ओळख झाली होती. झेउर रेहमान याने फिर्यादी महिलेला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले, तसेच ५ लाख रुपये जिममध्ये गुंतवणूक करा असं सांगितले.
फिर्यादी यांनी झेउर रेहमान यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर ५ लाख रुपये पाठवले. आरोपीने हे पैसे जिममध्ये गुंतवणूक करून परतावा न देता त्यांची फसवणूक केली. त्यांची फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी चंद्नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून झेउर रेहमान यांचासह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रेवले करत आहेत.