लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पेट्रोलियम कंपन्यांच्या टर्मिनल मधून बाहेर पडणा-या टॅन्कर मधून मास्टर की वापरून किंवा इतर मार्गाने पेट्रोल – डिझेल चोरणारे माफिये गेली कित्येक वर्षे सक्रिय आहे. पोलीस खाते, पुरवठा विभाग किंवा संबंधित पेट्रोलियम कंपन्या व शासकीय यंत्रणांना या पेट्रोल माफियांवर अंकुश ठेवायला अजिबातच जमले नाही. मात्र आता इंधन माफीयांच्यावर पोलीस खरोखरच नियंत्रण आणणार का? लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या कामगिरीकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.
काही महिन्यापूर्वी पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या पदाधिका-यांनी असेच पेट्रोल चोर पकडले होते. असोसिएशनच्या पदाधिका-यांना लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड टर्मिनल टर्मिनल मधून बाहेर पडणा-या टॅकरमधून काही माफिये पेट्रोलजन्य मालाची चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. याची शहानिशा करण्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी लोणी काळभोर येथे आले होते.
अधिकारी पाहणी करण्यासाठी टर्मिनल गेट समोर असलेल्या पार्किंग मधून फिरत असताना तेथे एक टॅकर टर्मिनल मधून पेट्रोलजन्य पदार्थ भरून आला. चालक टॅन्कर पार्किंगमध्ये लावून चलन आणण्यासाठी कार्यालयामध्ये गेला. हा मोका साधून तेथे दोन अनोळखी इसम आले. त्यांनी त्यांचे जवळ असलेल्या चावीने टॅकरच्या वरच्या झाकणाचे कुलूप उघडले. त्यांत पाईप टाकून एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये डिझेल काढू लागले. असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना जागीच पकडले. त्यांचेकडून उघडलेले कुलूप व तीन चाव्या आणि कॅनमध्ये असलेले २० लिटर डिझेल ताब्यात घेतले. व त्या दोघांचा फोटो काढला.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना तेथे पांढरे रंगांची एक कार ऊभी असलेली दिसली. त्यामध्येही पेट्रोल, डिझेलचा साठा होता. पदाधिकारी पाहणी करण्यात दंग आहेत. याचा मोका साधून ते दोघेही कार घेऊन फरार झाले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माल जप्त केला व पुरवठा विभागास कळवले. पुरवठा निरीक्षकांनी पंचनामा करून दोन अज्ञात इसमांविरोधांत फिर्याद दिली आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या परिसरात दहा किलोमिटर व्यासाच्या अंतरात छोटे मोठे साधारण १० हून अधिक पेट्रोल माफियांचे अड्डे आहेत. या ठिकाणांची माहिती ठराविक टॅन्कर चालकांना असते. टॅन्कर भरला कि हे चालक पहिल्यांदा टॅन्कर या माफियांच्या ठिकाणी घेऊन जातात. तेथे देण्या घेण्याचा व्यवहार पार पडतो. पाच ते दहा मिनिटात टॅन्कर तेथून बाहेर पडतो. गेल्या काही वर्षांपासून टॅन्करला जीपीएस सिस्टीम बसवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व टॅन्कर माफियांचे अड्डे महामार्गाच्या शेजारी आहेत. तरीही पोलिसांना, पुरवठा विभागाला किंवा शासनाच्या कुठल्याही विभागाला हे अड्डे सापडत नाहीत. किंवा सापडले तरीही काही कारणांमुळे कायदेशीर कारवाई होत नाही.
रासरोजपणे महामार्गालगत पेट्रोलजन्य पदार्थ बनावट चाव्यांचा वापर करून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणांत काढले जात असल्याची माहिती मिळते. परंतू, येथून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यास किंवा हिदूस्थान पेट्रोलियम टर्मिनल किंवा भारत पेट्रोलियम टर्मिनलच्या पदाधिकारी अथवा पोलीसांना माहिती कशी मिळत नाही ? ते या बाबीकडे मुद्दामच कानाडोळा करतात. अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. टर्मिनलमधून माल भरून कुलूप लावलेनंतर बाहेर पडलेल्या टॅन्करची एक चावी कंपनीकडे तर दुसरी पंपमालकाकडे असते मग चोरट्यांकडे चाव्या आल्या कोठून, किंवा येतात कोठून ? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकरणात कुंपणच शेत खात नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आठ दिवसापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी या पेट्रोल माफियांवर कारवाई केली आहे. आठ जणांना अटक करुन तब्बल ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशा प्रकारच्या कारवाई अधूनमधून होणे गरजेचे आहे. पेट्रोलियम कंपन्या, पुरवठा विभाग यांनी ही अशा प्रकारच्या कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
पेट्रोल माफियांवर फक्त पोलीस खात्यानेच कारवाई करण्याऐवजी संबंधित सर्व शासकीय विभागांनी समन्वय साधून ठराविक कालावधीत कारवाई केली पाहिजे, तरच हे अवैध धंदे बंद होतील अशी चर्चा लोणी काळभोर परिसरात सुरू आहे. यापूर्वी ही पुणे ग्रामीण पोलिसांच्या व नंतर पुणे शहर पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी पेट्रोल माफियांवर कारवाई केली आहे. या कारवायांमध्ये सातत्य नसते. पण आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण हे इंधन माफीयांच्यावर पोलीस खरोखरच नियंत्रण आणणार का? व त्यांच्या कामगिरीकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.
दरम्यान, पेट्रोल माफियांवर आज कारवाई झाली तरी दुस-या दिवशी नव्या जोमाने, नव्या उत्साहात परत पेट्रोल चोरीचे धंदे सुरू होतात. त्यामुळे या कारवायांबाबतीत विविध शासकीय खात्यांमध्ये समन्वय व सातत्य असणे आवश्यक आहे. समन्वय व सातत्य नसल्याने पेट्रोल माफियांचे फावले आहे. तर कधी पेट्रोल काढताना टॅन्करला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही धंदे मात्र मोठ्या प्रमाणात सुरुच आहेत. “मी मारल्या सारखं करतो, तू रडल्यासारखे कर” अशा प्रकारची कारवाई करुन हे अवैध धंदे बंद होणार नाहीत हे एकदा समजून घेण्याची गरज आहे.