पुणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कटरने गळा चिरल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या वडगाव शेरी भागातून समोर आली आहे.
ही घटना बुधवारी (ता. १६) रात्री घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
शिवशंकर शवरप्पा मेनसे (वय 30, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकणी पत्नी यल्लवा मेनसे (वय 30, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर हा वाहनचालक म्हणून काम करतो तर, त्याची पत्नी घर काम करते. शिवशंकर याचे दुसर्या महिलेसोबत प्रेमसंबंध असून, तीन वर्षांपासून त्यांची पत्नी वेगळी रहाते.
शिवशंकर याने पत्नीला बुधवारी (ता. १६) जेवणाचा डबा घेऊन वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात बोलावले होते. तेथे तो त्याची मिनी बस घेऊन थांबला होता.
दरम्यान, बोलण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला गाडीत बोलावून वाद घालून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. आणि तू मोबाईलवर चांगले स्टेटस ठेवतेस, असे सांगून धारदार लोखंडी कटरने तिच्या गळ्यावर वार केला.
त्यानंतर गाडी चालू करून पळ काढला. प्रसंगावधान राखत पत्नीने चालत्या गाडीतून उडी मारली. त्यानंतर पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.