सोलापूर : गुन्ह्यामध्ये नाममात्र अटक करुन जामिनावर सोडण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारताना पांगरी (ता. बार्शी) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई व एकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी (ता.११) रंगेहाथ पकडले आहे. यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ जयजयराम खूने (वय-३५), पोलीस शिपाई सुनील पुरभाजी बोधमवाड (वय-३१) आणि चहा कॅन्टीन चालक हसन इस्माईल सय्यद (वय-६५) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २९ वर्षीय व्यक्तीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या भावाविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यामध्ये दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गुन्ह्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या भावाला नाममात्र अटक करुन जामिनावर सोडवण्यासाठी तपासी अधिकारी नागनाथ खूने आणि पोलीस शिपाई सुनील बोधमवाड यांनी प्रत्येकी १५ हजार असे एकूण ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी एका २९ वर्षीय व्यक्तीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक खूने आणि पोलीस शिपाई बोधमवाड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. खूने आणि बोधमवाड यांच्यावतीने सदर लाच चहा कॅन्टीन चालवणाऱ्या हसन सय्यद यांनी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागनाथ खूने आणि सुनिल बोधमवाड यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ही कारवाई सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार कुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, गजानन किनगी आणि सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली आहे.