पुणे : पोपट वारंवार शिट्ट्या मारतो आणि त्याचा त्रास आम्हाला होतो. म्हणून शेजारी राहणाऱ्या नागरिकाने पोपटाच्या मालकावर खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश अंकुश शिंदे (वय-७२) यांनी या बद्दल पोलिसात तक्रार दिली आहे. तर कबर अमजद खान असे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोपटाच्या मालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि खान हे दोघे ही शिवाजीनगर इथं एकमेकांच्या शेजारी राहतात. पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात राहणारे अकबर अमजद खान यांनी एक पोपट पाळला आहे. हा पोपट सुरेश शिंदे यांना बघून शिट्या मारत होता. हे वारंवार होत असल्याने अखेर चिडलेल्या शिंदे यांनी खान यांना तुमचा पोपट माझी झोपमोड करतो, मला त्याच्या शिट्टीचा त्रास होतो. तुम्ही त्याला दुसरीकडे ठेवा.
दरम्यान, या कारणावरून पोपट मालकांने शिंदे यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.