इंदापूर : जुन्या भांडणाच्या रागातून तुझ्या भावाला आज आम्ही मारणार असल्याचे असे जाहीर करून एका २० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना इंदापूरमध्ये उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. ०४) इंदापूर शहराजवळ असलेल्या सातपुतेवस्ती कॅनल जवळ घडली आहे.
प्रणव नानासाहेब करे (वय – २०, रा. करेवाडी, ता. इंदापूर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर राजकुमार पवार, इरफान शेख (दोघेही रा. इंदापूर), फरदिन मुलाणी (रा. वडापूरी ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ प्रतिक नानासाहेब करे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी फिर्यादीला घरी असताना आरोपी राजकुमार पवार याचा फोन आला. व त्याने फोनवरून सांगितले कि तुझ्या भावाला आज आम्ही मारणार आहोत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सातपुते वस्तीवर प्रणवचा अपघात झाल्याचा फोन आला.
सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता प्रणवची गाडी पडलेली होती. त्या ठिकाणी राजकुमार पवार व त्याचे मित्रही उपस्थित होते. त्यांनतर प्रणव यास दवाखान्यात उपचारासाठी नेल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, डॉक्टरांनी प्रणवला मृत झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृत युवकाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. रात्री उशिरा राजकुमार पवार, फरदीन मुलाणी, इरफान शेख यांनी जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारल्याची फिर्याद दिल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे हे करत आहेत.