पुणे : अस म्हणतात, ‘पुणे तिथं काय उणं,’या म्हणीचा प्रत्यय नुकताच आला. पुण्यात कुत्रा, पोपट, यांच्यावरुन वाद झाल्याचे आपण ऐकले आहे, पण पहिल्यांदाच म्हशीमुळे दोन कुंटुब आमने-सामने उभे ठाकले, दोघांमध्ये हाणामारी झाली. ही घटना रविवारी (25 सप्टेंबर) घडली. म्हशीच्या शेणावरून झालेल्या वादामुळे या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा प्रकार अर्थात पुण्यात घडला.पुण्यातील बंडगार्डन परिसरात एका म्हशीने हर्षल मल्लाव यांच्या घरासमोर घाण केली होती. त्यानंतर त्यांनी म्हशीच्या मालकाला यासंदर्भात जाब विचारला. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोघांचे नातेवाईकही यात सहभागी झाले. या सर्व प्रकारानंतर काही स्थानिक तरुणांनी दोन्ही कुटुंबियांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हशीनं घरासमोर घाण केल्याच्या कारणावरून थेट दोन कुटुंबात मारामारी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
यामध्ये झालेल्या हाणामारीत म्हशीच्या मालकाला गंभीर दुखापत झाली आहे व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच झालेल्या हाणामारीत 2 जणांवर सोमवारी (26 सप्टेंबर) गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी या घटनेची दखल घेत हर्षल मल्लाव, राहुल काची आणि यश मल्लाव या तिन आरोपींना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात पोपट वारंवार शिट्ट्या मारतो म्हणून पोपटाच्या मालकाविरोधात खडकी पोलिस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.