वाशीम : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अँस्ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशीम जिल्हा न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
नवाब मलिक सध्या मनी लॉंड्रीग प्रकरणामध्ये तुरुंगात असून या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे व राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्यात संघर्ष सुरु होता. यादरम्यान मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेऊन जातीवाचक टिपणी करण्यात आली होती.
यासंदर्भात समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी या प्रकरणात वाशीम न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी न्यायालयाने समीर वानखेडे यांना याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर समीर वानखेडे यांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी स्वतः येऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात आली होती.
या सुनावणीत न्यायालयाने नवाब मलिक यांच्या विरोधात अँस्ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या आदेशामुळे नवाब मलिक यांच्या जामीन मिळविण्याच्या प्रक्रियेत मोठा अडसर निर्माण होणार आहे.