पुणे : मारहाण करून मागील चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला वानवडी पोलिसांनी वाल्मिक वस्ती, रामटेकडी येथून अटक केली आहे.
सतिश आबा कसबे, (वय-३१, रा. स.नं. ११० साई बाबा मंदिर जवळ, रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोरून जात असताना घरासमोर ठेवलेल्या भांड्याला सतीश कसबे व त्याच्या एका साथीदाराने लाथ मारली होती. फिर्यादीने यावेळी सतीश व त्याच्या साथीदाराला लाथ का मारली असे विचारले असता दोन अज्ञात आरोपीने लाकडी बांबुने व दगडाने त्यांचे घरातील साहित्याची तोडफोड करून फीर्यादीचे उजवे हाताचे मनगटावर मारून जखमी केले. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तेव्हापसुन आरोपी सतीश हा पोलिसांना वारंवार चकवा देत होता.
वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षापासून फरार असलेला आरोपी सतीश हा वाल्मिक वस्ती, रामटेकडी, पुणे येथे आलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जावून त्यास पथकाने ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचा यापूर्वी अटक साथीदार हॅरी सुब्रमण्यम गोपाळ (रा.स.नं. ११०, रामटेकडी, हडपसर) याचेसह केल्याची कबूली दिली. त्यानुसार त्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कामगिरी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले, यांचे दिमतीत तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज साळुखे, विनोद भंडलकर, राहुल गोसावी, अमोल गायकवाड यांनी केलेली आहे.