संतोष गायकवाड
Wagholi News वाघोली, (पुणे) : नदीपात्रातील मोटारीचा फूटव्हॉल्व्ह गाळातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना न्हावी सांडस (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. (Wagholi News) हि घटना १ एप्रिल रोजी घडली आहे. (Wagholi News)
याप्रकरणी सुरक्षेचे साधन न देता फूटव्हॉल्व्ह काढण्यास लावून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फूटव्हॉल्व्ह काढायला लावणाऱ्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल सुभाष शितोळे (वय-३६) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या आई मंदाकिनी सुभाष शितोळे (वय-६५) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित प्रकाश कोतवाल (रा. जगतापवाडी, अष्टापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अमोल याला प्रकाश कोतवाल यांनी नदीपात्रातील मोटरीचा फूटव्हॉल्व्ह बाहेर काढण्यासाठी घेऊन गेले. अमोल पाण्यात उतरला होता. मात्र, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी मोटारीजवळ अमोल याचे कपडे दिसले.
दरम्यान, अग्निशमन दलाला कळविल्यानंतर गाळात रुतलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, प्रकाश कोतवाल यांनी अमोल याला सुरक्षिततेची साधने न पुरविल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.