(Wagholi Crime) वाघोली, (पुणे) : होंडा कंपनीचे दुचाकीत वापरण्यात येणारे बनावट एअर फिल्टर विक्री करणाऱ्या वाघोली (ता. हवेली) येथील दोन दुकानांवर लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून दुकानांच्या मालकांवर कॉपी राईट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मातोश्री गॅरेजचे राम पोपट तांबे व नाकोडा ऑटोमोबाईल्सचे अल्पेश प्रकाचंदजी शहा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. लोणीकंद पोलिसांनी त्यांच्यावर कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी होंडा कंपनीच्या वतीने ऑपरेशन हेड रेवणनाथ केकान यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
वाघोली येथील दुकानांमध्ये होंडा कंपनीचे स्पेअर पार्टची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानुसार होंडा कंपनीच्या वतीने ऑपरेशन हेड रेवणनाथ केकान यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने लोणीकंद पोलिसांनी वाघोली गावातील मातोश्री गॅरेज येथे छापा टाकून होंडा दुचाकीत वापरण्यात येणारे २०८ बनावट एअर फिल्टर जप्त करण्यात आले.
दरम्यान, पुणे-नगर महामार्गालगत असणारे नाकोडा ऑटोमोबाईल्स या स्पेअरपार्ट विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी देखील होंडा दुचाकीत वापरण्यात येणारे ११४ बनावट एअर फिल्टर जप्त करण्यात आले.