(Wagholi Crime )लोणीकंद, (पुणे) : वाघोली येथून सेंटरिंगच्या ४२० लोखंडी प्लेटा भाड्याने घेवुन त्याचे भाडे व त्या प्लेटही माघारी न दिल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द ८ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाजीम झाकीर शेख (रा. ऊरळी कांचन, ता. हवेली), अझम वजीर शेख (रा. सय्यदनगर, हडपसर) आणि इरफान वाहिद अन्सारी (रा. सय्यदनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात गजानन तुकाराम रासकर (क्रांती पार्क 2, खराडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
डिसेंबर २०२१ ते आजपर्यंत वाघोली येथील आव्हाळवाडीमधील सैनिक कॉलनीतील तुषार असोसिएट्सच्या गोडाऊनमधून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून सेंटरिंगच्या ४२० लोखंडी प्लेटा भाडयाने घेतल्या.
लोखंडी प्लेटाचे भाडे न देता तसेच त्या प्लेटा परत न करता फिर्यादी यांची ८ लाख ६५ हजार रूपयांची फसवणूक केली. फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.