लोणी काळभोर, (पुणे) : अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिता पुत्रांवर धारदार लोखंडी शस्त्राने वार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या इसमास गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटात जेरबंद केले आहे. वाघोली (ता. हवेली) हद्दीतील श्रीदत्त हॉटेल बायफ रोड शेजारी बुधवारी (ता. २२) ही घटना घडली आहे.
रवींद्र श्रीराम कदम (वय -३९ रा. पवार यांचे खोलीत भाड्याने, बायफ रोड, वाघोली, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपी इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी युनिट सहाचे पथक गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे व नितीन धाडगे यांना एका खबऱ्या कडून माहिती मिळाली की,एक इसम हातात लोखंडी हत्यारासह असून त्याने श्रीदत्त हॉटेल बायफ रोड, वाघोली येथे पिता पुत्रांवर सपासप वार करुन गंभीर जखमी केले असून, पळून जाण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी पोलीस पथकासह रवाना झाले. यावेळी एका इसमास स्थानिक रहिवासी हिरामण चौधरी, संजय कांबळे, राहुल अवचिते यांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे रविंद्र कदम असे सांगितले.
दरम्यान, पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिता पुत्रांवर धारदार लोखंडी शस्त्राने वार केला असल्याचे कदम याने कबूल केले आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस नाईक रमेश मेमाने, पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे यांच्या पथकाने केली आहे.